कलचुरी काळातील आर्थिक परिस्थिती1 min read
Reading Time: 3 minutesकलचुरी घराण्याचे दक्षिण भारतामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दक्षिण भारतामध्ये कलचुरी घराण्याच्या ज्या शाखा होत्या त्यामध्ये महिष्मती म्हणजेच आत्ताचे महेश्वर, त्रिपुरी, सरयूपार आणि रत्नपूर अश्या शाखा आपल्याला पहायला मिळतात. या विविध शाखांच्या मुळे आपल्याला कलचुरी काळातील दक्षिण भारतातील धार्मिक, सामाजिक, आणि आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत होते. दक्षिण भारताच्या प्राचीन इतिहासात वाकाटक आणि कलचुरी हि अत्यंत महत्वाची दोन राजघराणी होऊन गेली त्यामुळे या दोन्ही राजघराण्यांची राजकीय, धार्मिक, कलाविषयक कामगिरी अत्यंत महत्वाची आहे.
कलचुरी घराणे जेव्हा दक्षिण भारतावर राज्य करत होते तेव्हा कलचुरी घराण्याचे आजपर्यंत जे शिलालेख किंवा ताम्रपट किंवा नाणी मिळाली आहेत त्यामधून आपल्याला कलचुरी राजांच्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत होते. कलचुरी राजघराण्याच्या आधी सातवाहन आणि अभिर राजघराणे जवळपास सगळ्या दक्षिण महाराष्ट्रावर राज्य करत होते यांच्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये श्रेणी किंवा कामगारांचे संघ होते असे आपल्याला पहावयास मिळते. या सगळ्यांचे संदर्भ हे आपल्याला त्यांच्या कोरीव लेखांच्यामधून मिळतात. या या व्यापाऱ्यांच्या श्रेणी नंतरच्या कालखंडात देखील चालू होत्या असे आपल्याला पहायला मिळते. या व्यापाऱ्यांच्या श्रेणींचा प्राचीन काळात बँकांच्या सारखा उपयोग होत असे.

Image:- कलचुरी साम्राज्याच्या ताम्रपटाचे सील. Image Source:- http://www.archeolog-home.com
धनिक म्हणजे श्रीमंत लोक याच्यामध्ये पैसे ठेवून त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग हा धार्मिक कृत्यांच्यासाठी केला जावा अशी व्यवस्था करत असत. जरी राजवटी बदलल्या तरी या श्रेणी कायम राहत असत. म्हणूनच दानशूर लोक आपल्या देणग्या या सरकार दरबारी न देता या श्रेण्यांच्याकडे स्वाधीन करत असत. तसेच तत्कालीन व्यापाऱ्यांचे समान व्यवसाय करणाऱ्यांचे ‘गण’ नावाचे संघ असायचे. नगरधन येथे जो ताम्रपट सापडलेला आहे त्याच्यामध्ये माहुतांच्या गणाने ब्राम्हणाला दिलेल्या भूमिदानाचा उल्लेख आपल्याला सापडतो. या भूमिदानाच्यासाठी तत्कालीन राजाची संमती आवश्यक होती परंतु ताम्रपटाच्या मुद्रेवर त्या गणाने आपले विशिष्ट चिन्ह अंकुश आणि ‘गणद्त्ति’ म्हणजेच हे गणाचे दान आहे असे शब्द हे कोरलेले आहेत. यागोष्टीवरून त्यांचे राज्यातील महत्व आपल्याला समजण्यास मदत होते. तसेच या गणांच्या सभासदांच्या समितीला ‘समूह’ असे म्हणत असत. तसेच या समूहाच्या अध्यक्षाला ‘स्थविर’ असे म्हणत असत आणि कार्यकारी मंडळाच्या सभासदांना ‘प्रमुख’ असे संबोधत असत.
याचप्रमाणे आपल्याला इतर व्यावसायिकांचे देखील गण त्याकाळात असावेत असे वाटते. या संबंधात इतर दक्षिण भारतीय राजवंशात आपल्याला कोरीव उल्लेख सापडतात. परंतु कलचुरींच्या बाबत असे लेख आढळून येत नाही हे आपल्याला विशेष म्हणावे लागेल. तसेच कारीलताई येथील लेखामध्ये ज्या वागुलिक आणि पायटी यांनी प्रत्येकी ५० विड्यांच्या पानांचे दान दिल्याचा उल्लेख आहे ते त्या व्यावसियकांचे गण असावेत असे वाटते. तसेच कलचुरी काळामध्ये गणांच्या मुख्यास ‘देशि’ असे म्हणत असत. तसेच बिलहरी लेखामध्ये कृषायपंचकाच्या देशिने काही दान दिल्याचा निर्देश आहे. तसेच श्रेणी आणि गण यांचे सैन्य असे. या सैन्याचा उपयोग संकटकाळी शासन सत्तेस होत असे.

Image:- कलचुरी घराण्यातील कृष्णराजा कलचुरी याचे चांदीचे नाणे. Image Source:- https://commons.wikimedia.org/
कलचुरी काळातील विक्रीकर:-
कलचुरी काळामध्ये नगरांच्या मध्ये तसेच छोट्या गावांच्यामध्ये बाजारासाठी मंडपिका म्हणजेच मंडई असायची. विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू सगळ्यात पहिल्यांदा या मंडईमध्ये नेल्या जात असे. तसेच मंडई येथे आलेल्या या वस्तूंचे मूल्यमापन होऊन विक्रीकर ठरविला जात असे. कलचुरी काळातील बाजारामध्ये वस्तू विकण्यासाठी जो परवाना म्हणून चिट्ठी दिली जात असे त्याला ‘युगा’ असे म्हणत. हि युगा चिट्ठी दिवसभर चालत असे. यासाठी शासनाला अर्ध पौर दिला जात असे. पौर हे कलचुरी काळातील लहान नाणे होते. बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक घोड्यावर दोन पौर आणि हत्तीवर चार पौर विक्रीकर द्यावा लागत असे. बाजारांच्यामध्ये ‘विथी’ किंवा दुकानांच्या रांगा असत. तसेच कलचुरी काळामध्ये लहान दुकानांना ‘आवार’ असे म्हणत असत.
या कलचुरी काळी असलेल्या बाजारांच्या मध्ये विविध प्रकारचे जिन्नस विकायला असे. त्यामध्ये धान्य, सुपारी, विड्याची पाने मीठ, मोहरी, सुंठ, कापड अश्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला कलचुरी काळातील लेखांच्या मधून आढळून येतो.

Image:- कलचुरी घराण्यातील कृष्णराजा कलचुरी याचे तांब्याचे नाणे. Image Source:- https://www.mintageworld.com
कलचुरी काळातील वजने आणि मापे:-
कलचुरी काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मापे अस्तित्वात होती. कलचुरी काळामध्ये जिल्ह्यामध्ये जी मापे वापरली जात असत त्यांना ‘विषयमान’ असे संबोधत तसेच मोठ्या मापांना ‘बृहन्मान’ असे म्हणत असत. तसेच जमिनीच्या मापास निवर्तन असे संबोधत असत. कलचुरी यांच्या एका ताम्रपटामध्ये ‘उभयचत्वारिंशकनिवर्तनिन’ असा उल्लेख आलेला आपल्याला पहावयास मिळतो. याच्यावरून हे निवर्तन चाळीस दंड रुंद आणि चाळीस दंड लांब अश्या जमिनीचे निदर्शक होते असे समजण्यास आपल्याला मदत होते. कित्येक वेळेस जमिनीचे मोजमाप हे हलांच्या संख्येने दर्शवत असत. हल म्हणजे बैलांच्या एका जोडीने नांगरली जाईल इतकी जमीन. हि बऱ्याच वेळेस पाच एकर असे. तसेच अजून एक प्रमाण प्रचलित होते ते म्हणजे शेतामध्ये पेरण्यास आवश्यक असलेल्या बियाणांच्या वरून मोजमाप केले जात असे. याचे उदाहरण आपल्याला एका शिलालेखात मिळते त्यामध्ये ‘व्रिहिपिटकक्षेत्र’ म्हणजे शेताच्या बियाणाकरिता एक पिटक तांदळाचे भात लागे असे समजले जात असे.
अश्या प्रकारे कलचुरी कालखंडात (६ व्या ते ७ व्या शतकात) आपल्याला व्यापार होताना पहावयास मिळतो तसेच प्राचीन दक्षिण भारतातील कलचुरी राजघराण्याच्या कालखंडात आर्थिक व्यवस्था कशी होती हे देखील समजण्यास आपल्याला मदत होते.
संदर्भ:-
१) कलचुरी नृपती आणि त्यांचा काळ:- वा. वि. मिराशी, मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद, १९५६.

