वाकाटक काळातील वेशभूषा1 min read
Reading Time: 5 minutesप्राचीन महाराष्ट्रातील वाकाटक राजवंश हा भारतातील प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध राजवंश असून वाकाटकांच्या कालखंडाला ‘सुवर्णयुग’ असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे कारण या कालखंडामध्ये हिंदुधर्म, संस्कृत आणि प्राकृत वाड.मय(literature), तसेच शिल्प आणि स्थापत्य व चित्रकला यांचा वाकाटकांच्या कालखंडात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला आपल्याला पहावयास मिळतो. याच वाकाटकांच्या कालखंडात परदेशी व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि या व्यापार वाढीमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार हा जगभरात झालेला आपल्याला तत्कालीन परिस्थिती वरून समजण्यास मदत होते. सगळ्या जगात प्रसिद्ध असलेली आणि आज युनेस्को वर्ल्ड हेरीटेज साईट असलेली अजिंठ्याची लेणी हि वाकाटक राजांच्या कालखंडात निर्माण झाली त्यामुळे वाकाटक राजवंशाचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. अश्या या महत्वाच्या वाकाटक राजघराण्याच्या कालखंडात वेशभूषा कश्या पद्धतीची होती हे देखील समजून घेणे आपल्याला कुतूहलाची बाब ठरते.
महाराष्ट्रातील म्हणजेच मुख्यत्वे करून विदर्भातील असलेल्या वाकाटक राजघराण्याचे आजपर्यंत बरेच शिलालेख(Inscription) देखील मोठ्या प्रमाणात सापडलेले आपल्याला पहावयास मिळतात परंतु या शिलालेखांच्या मध्यामातून आपल्याला तत्कालीन लोकांची राहणीमान पद्धत, त्यांचे वस्त्र आणि अलंकार, केश रचना, शिरोभूषणे, शस्त्रे, घरे, भांडी, तत्कालीन वाद्ये यांची कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही यासाठी आपल्याला वाकाटकांच्या कालखंडातील वाड.मय(literature), शिल्पे आणि चित्रे यांचा अभ्यास करावा लागतो. वाकाटकांच्या कालखंडामध्ये विदर्भात विविध काव्ये रचली गेली परंतु त्यातील कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत काव्य आणि प्रवरसेनाचे सेतुबंध हे प्राकृत काव्य सध्या उपलब्ध आहेत.
तसेच बाकीची काव्ये हि काळानुसार नष्ट झाली असल्यामुळे कालिदास आणि प्रवरसेन यांची काव्ये खूप महत्वाची ठरतात. वाकाटक काळातील सामाजिक परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीमधील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी फार महत्वाची ठरतात. हि लेणी वाकाटक काळामध्येच कोरली होती आणि त्यामधील चित्रे देखील वाकाटक काळामध्ये काढली असल्याने आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती समजण्यासाठी मदत होते.
सुदैवाने आजही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील हि चित्रे अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील शिल्पे आणि चित्रे यांच्यावरून आपल्याला वाकाटक काळातील स्त्री-पुरुषांच्या वस्त्रालंकरांची व्यवस्थित कल्पना करता येते. यामध्ये आपल्याला बहुतेक स्त्री पुरुष हे आखूड अन्तरीयक म्हणजेच अधोवस्त्र नेसलेले दाखवलेले आहेत. हे नेसलेले वस्त्र गुडघ्याच्या वर असल्यामुळे याला अर्धोरुक अशी संज्ञा आहे. बाणाने आपल्या हर्षचरित या वस्त्राचे वर्णन ‘प्रकटितोरुत्रिभाग’ म्हणजेच ज्याच्यामध्ये मांडीचा तृतीयांश भाग उघडा आहे असे केलेले दिसते. हे वस्त्र वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्याचे असे.
पवनार याठिकाणी एक शिल्पपट सापडलेला आहे त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, यांची वस्त्रे देखील याच प्रकारची आडव्या पट्ट्यांची दाखवलेली आहेत परंतु हि वस्त्रे जास्त रुंद म्हणजेच जवळपास घोट्या पर्यंत आलेली आपल्याला पहावयास मिळतात. तसेच या वस्त्राचा एक शेवट डाव्या मांडीवरून जाऊन त्याचा मागे क्च्छ म्हणजेच कासोटा होत असे. दुसरा शेवट दोन्ही मांड्याना मागून पुढून वेष्टून नंतर मागच्या बाजूला खोवून खाली शेपूट असल्यासारखा लोंबत असे. याच प्रकारच्या परिधान पद्धतीमध्ये पुढच्या भागामध्ये निऱ्या दिसत नसत परंतु पाठीमागे मात्र अधोवस्त्राचा शेवट शेपटासारखा लोंबत असे.
तसे पहायला गेले तर उत्तर भारतामध्ये अन्तरीयक नेसण्याची पद्धत हि उलटी होती. या अन्तरीयकाच्या निऱ्याचे सोगे पुढे सुटलेले असत याची उदाहरणे आपल्याला सांची आणि भरहूत येथील शिल्पांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. तसे पहायला गेले तर अजिंठा लेणीच्या वाकाटक काळातील लेण्यामध्ये अश्या पद्धती मधल्या पुढील निऱ्या कुठेही आपल्याला पहायला मिळत नाहीत. परंतु मागील शेपूट असल्यासारखे सोगे मात्र आपल्याला खूप ठिकाणी आढळून येतात. दक्षिणात्य लोकांच्या या परिधानपद्धतीचे गंमतीशीर वर्णन हे ‘राजतरंगिणी’ (काश्मीरचा इतिहास) लिहिणाऱ्या कल्हणाने ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्येच केलेले आपल्याला पहायला मिळते. ‘राजतरंगिणी’ याच्यामधील वर्णन पुढीलप्रमाणे:-
क्षितीभृद्दाक्षिणात्यानां तिर्यक्त्वज्ञापनाय स: |
पुच्छं महातलस्पर्शि चक्रे कौपीनवाससि ||
अर्थ:-
दाक्षिणात्य लोक पशु आहेत हे दाखविण्याकरिता त्या काश्मीरच्या राजाने त्यांना आपल्या लुंगीचा शेवट जमिनीला स्पर्श होईल इतका लांब ठेवणे भाग पाडले.
स्त्रियांची देखील अधोवस्त्र नेसण्याची पद्धत याच तऱ्हेची होती हे आपल्याला काही चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. काही चित्रांच्यामध्ये या स्त्रिया पाठमोऱ्या बसलेल्या किंवा उभ्या आहेत अश्या चित्रांच्या माध्यमातून खाली लोंबणाऱ्या कासोट्यावरून समजण्यास मदत होते. तसेच काही स्त्रिया या अधोवस्त्र कच्छरहित पद्धतीने नेसत असत.हे देखील आपल्याला अजिंठ्याच्या लेणीतील चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. तसेच काही पुरुष हे सध्याच्या हाफ पँट सारखा मांड चोळणा घालीत असत आणि कटी बंधाने तो कंबरेला बंधित असे. या हाफ पँट सारख्या मांड चोळण्याला ‘चंडातक’ असे म्हणत असत. अजिंठा लेणी मधील सतरा क्रमांकाच्या लेण्यामध्ये आपल्याला उजव्या भिंतीच्या जवळ असलेल्या खांबाच्या वरील यक्ष असा ‘चंडातक’ नेसलेला आढळून येतो.
बाणाच्या हर्षचरितामधील वर्णनामधून आपल्याला तत्कालीन स्त्रिया देखील अश्या ‘चंडातक’ नेसून त्याच्यावर पायघोळ कंचुक किंवा झगा घालत असत असे दिसते. पुरुष घोड्यावर अथवा शिकारीला गेले असताना तुमान घालून त्याच्यावर पूर्ण बाह्यांचा गुडघ्यापर्यंत खाली आलेला कोट घालत असत असे आपल्याला पहावयास मिळते. अजिंठा लेणीमधील सतराव्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये मृगजातक कथेत शिकारीला गेलेल्या राजाचा पोषाख आपल्याला वरच्या वर्णनाप्रमाणे पहावयास मिळतो. तसेच असाच पोषाख हा गुप्त राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला आढळतो. तसेच काही चित्रांमध्ये नोकरांनी देखील पूर्ण बाह्यांचे अंगरखे घातलेले आढळतात.
तत्कालीन पुरुष सामन्यत: उत्तरीय वापरीत असत असे दिसते. हे उत्तरीय जानव्याप्रमाणे डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून जात असे त्यामुळे उजवा हाट पूर्णपणे मोकळा राहत असे. काही चित्रांच्यामध्ये आपल्याला हे उत्तरीय पुन: दुमडून डाव्या खांद्यावर टाकलेले आपल्याला दिसते. तसेच तत्कालीन काही लोक उत्तरीयाची पट्टी करून वैकक्षकासारखे वापरीत असत. तसेच काही लोक हे कमरेला बांधून बद्धपरिकर होत.
म्हैसूरच्या राजदरबारात असलेल्या सर्व सेवकांनी अश्या रीतीने बद्धपरिकर होऊन राहिले पाहिजे असा नियम आजही आहे. तसेच काही लोक एकच लांब वस्त्र नेसून त्याचाच नंतर उत्तरीया सारखा उपयोग करीत असत असे चित्रांच्या वरून समजण्यास मदत होते. तसेच काही तत्कालीन पुरुष हे पूर्ण बाह्यांचा अंगरखा घालून वर उत्तरीय पांघरीत असत. अजिंठ्याच्या लेण्यातील सतरावे लेणे जर आपण नीट पाहिले तर आपल्याला लेण्यामध्ये हंस जातक कथा पहायला मिळते यामध्ये प्रधानाचा पोषाख हा वरील वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला पहावयास मिळतो.
अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपल्याला चित्रांच्यामध्ये अनेक राजा आणि राणी तसेच तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या शरीरांचा वरचा भाग हा अनावृत्त दाखविला आहे असेच वाटते तसेच या राजा आणि राणींच्या किंवा तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या दासदासी मात्र वस्त्रावृत्त पहायला मिळतात. यामध्ये समजातील वरच्या वर्गातील स्त्रीपुरुषांनी तलम वस्त्रे वापरलेली आहेत हे दाखविण्याचा हा उद्देश आहे असे समजते. संस्कृत कवींच्या काव्यांच्यामध्ये यांची वर्णने हि ‘नि:श्वासहार्य’ म्हणजेच केवळ श्वासानेही उडून जाणारी ‘निर्मोकलघुत्तर’ म्हणजेच सापाच्या कातीपेक्षा देखील तलम होती असे वर्णन आढळून येते. तसेच हि वस्त्रे वापरली असता आतमधील कूचमंडल, मांड्या, अंगाला लावलेले चंदन, वापरलेले अलंकार इत्यादी स्पष्ट दिसत असे असे वर्णन विविध काव्यांच्यामधून आढळून येते.
हाच प्रकार आपल्याला अजिंठ्याच्या चित्रांच्यामध्ये पहायला मिळतो. काही स्त्रिया आपल्या छातीवर रुंद पट्टी बांधत असत या पट्टीला ‘पयोधरपट’ असे म्हणतात. अजिंठा लेणीमधील मरणोन्मुख सुंदरीच्या चित्रामध्ये तिला पंख्याने वारा घालणाऱ्या स्त्रीने अश्या पद्धतीचा ‘पयोधरपट’ वापरलेला आपल्याला पहायला मिळतो. तसेच विश्वंतर जातकाच्या कथेमध्ये राजाच्या शेजारी जी राणी बसलेली आहे तिने देखील असाच ‘पयोधरपट’ घातलेला दाखवलेला आहे. तसेच अजिंठा लेणीच्या सोळा क्रमांकाच्या गुहेमध्ये असलेल्या चित्रात मायादेवी शुद्धोदन राजाला आपले स्वप्न सांगत आहे त्याठिकाणी एक स्त्री आपल्याला पहावयास मिळते त्या स्त्रीने चोळी घातलेली आपल्याला चित्रात पहावयास मिळते. तसेच सतराव्या लेण्यामध्ये असलेल्या विश्वांतर जातकामध्ये दान मागण्यासाठी बरेच याचक जमलेले आहेत असे दृश्य दाखवलेले आहे त्या चित्रामध्ये कडेवर मुल असलेल्या एका स्त्रीने वर रंगीत फुले असलेली चोळी किंवा अर्धबाह्यांचे जॅकीट घातलेले आपल्याला पहावयास मिळते.
याच लेण्यामध्ये आपल्याला सिंहलावदानात हल्लीच्या महाराष्ट्रातील स्त्रिया ज्याप्रमाणे खणांची हिरवी चोळी घालतात तशी चोळी घातलेली एक स्त्री देखील पहावयास मिळते. परदेशी शक तसेच कुशाण जातीच्या स्त्रिया चोळीच्या ऐवजी अर्धबाह्यांचे जॅकीट घालत असत असे चित्र आपल्याला पहावयास मिळते. मुलांची वस्त्रे नेसण्याची पद्धत हि पुरुषांच्या सारखीच असे हे सिद्धार्थ याच्या लहानपणाच्या चित्रांच्यावरून आपणास समजायला मदत होते. यामध्ये काही लहान मुलांच्या अन्तरीयाचे शेपूट आपल्याला स्पष्टपणे पहावयास मिळतात. तसेच काही मुलांनी उत्तरीयासारखा स्कार्फ आपल्या खांद्यावर टाकल्यासारखा पहावयास मिळतो.
सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा शाळेत शिकत असे तेव्हा त्याने पूर्ण बाह्या असलेला अंगरखा घातलेला चित्रामध्ये दाखवलेला आहे तसेच त्याच्या काही मित्रांच्या कमरेचा वरचा भाग उघडा आहे हे देखील चित्रामध्ये आपल्याला पहावयास मिळते. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध तीन वस्त्रे वापरीत असे १) अन्तरवासक या वस्त्राला प्रसिद्ध चिनी प्रवासी युआन श्वांग निवासन असे म्हणतो तसेच हे अधोवस्त्र हे कमरेत पट्ट्याने बांधले असे. २) उत्तरासंग याचे दुसरे नाव संकक्षिका असे होते या वस्त्राचा उल्लेख बाणाने देखील केलेला आहे याचा वापर हा उत्तरीयासारखा पांघरण्यासाठी केला जात असे. ३) संघाटी किंवा लांब अंगरखा अजिंठा लेणीमध्ये आपल्याला काही ठिकाणी गौतम बुद्धाने उत्तरासंग पांघरले असल्याचे पहायला मिळते. तसेच काही ठिकाणी आपल्याला पायघोळ अंगरखा घातलेला आहे असे आपल्याला पहावयास मिळते.
अश्या प्रकारे वाकाटक कालखंडामध्ये चित्रांच्या वरून वस्त्र रचना समजण्यास अधिक मदत होते तसेच तत्कालीन कालखंडात कोणती वस्त्रे वापरली जात असत हे देखील आपल्याला तत्कालीन वाड.मय(literature) याच्यावरून समजण्यास आपल्याला मदत होते. अशीच वस्त्रपरंपरा आपल्याला काही अंशात महाराष्ट्राच्या काही भागात आजही पहायला मिळते. फक्त त्या वस्त्र परंप्रेचे स्वरूप मात्र बदलेले आपल्याला दिसते.
संदर्भग्रंथ:-
१) राजतरंगिणी (काश्मीरचा इतिहास):- कल्हण
२) अजंठा:- गुलाम याझदानी, हैद्राबाद संस्थान
३) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ:- डॉ. वा. वि. मिराशी.

