Deccan

अहमदनगरची चित्रकला1 min read

Mar 26, 2022 11 min

अहमदनगरची चित्रकला1 min read

Reading Time: 11 minutes

प्राचीन भारतातील चित्रकला असे नाव जरी निघाले तरी आपल्याला पहिले डोळ्यासमोर नाव उभे राहते ते म्हणजे अजिंठा लेण्यांचे. या अजिंठा लेणीमधील चित्रशैली हि सगळ्या भारतामध्येच नव्हे तर सगळ्या जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. गौतम बुद्ध याच्या थोरवीचे प्रकटन करण्यासाठी अजिंठा लेणी मधील चित्रे रंगविण्यात आली. येथील चित्रकलेची परंपरा अत्यंत महत्वाची ठरते याचे मुख्य कारण म्हणजे आजही अजिंठा लेणीमध्ये असलेली लेणी क्रमांक १ लेणी क्रमांक २ आणि लेणी क्रमांक १७ या लेण्यांच्या मधील चित्रकला नक्कीच त्याकाळातील चित्रकलेचा सर्वोच्च बिंदू आहेत असे आपल्याला पहायला मिळते. अजिंठा लेणीमधील क्रमांक १ मध्ये आजही भिंती, खांब छत हे सगळे रंगकामाने सजवलेले आपल्याला बघायला मिळते.

अजिंठा लेणीमधील भिंतीवरील चित्रे हि जरी बोधीसत्वाची असली तरी गौतम बुद्ध यांच्या चरित्रातील प्रसंग देखील चितारलेले आपल्याला बघायला मिळतात. तसेच लेणीमधील स्तंभांवर  आणि छतावर केले रंगकाम हे अलंकरात्मक केलेले असून शोभेसाठी केलेले आपल्याला पहावयास मिळते. मातकट दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या पृष्ठभूमीवर आपल्याला फळेफुले, भौमितिक आकृती, पशुपक्षी, तसेच यक्ष-यक्षी यांची सुंदर चित्रे आपल्याला पहायला मिळतात. याच धर्तीवर पुढे वेरूळ(Elora) येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिरामध्ये देखील अशीच चित्रे रंगविण्यात आलेली आपल्याला पहायला मिळतात.

Image:- अजंठा लेणीमधील चित्रे. Image Source:- https://en.wikipedia.org

सध्या वेरूळ येथील लेण्यांमधील चित्रांची बऱ्यापैकी झिज झालेली असून काही लेण्यांमध्ये मात्र आजही चित्रे सुस्थितीत पहायला मिळतात. वेरूळ लेण्यामध्ये देखील स्तंभ, छत, भिंती हा सर्व भाग चित्रांनी मढवलेला आपल्याला पहायला मिळतो. अशीच काही चित्रे आजही मुंबई येथील बोरीवली मध्ये असलेल्या कान्हेरी लेणी आणि जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याच्या पोटामध्ये असलेल्या लेणीमध्ये देखील पहावयास मिळतात. या सर्व गोष्टींच्यावरून वास्तूशोभेसाठी तसेच इमारती सुशोभित करण्यासाठी चित्रकामाचा उपयोग होत होता असे आपल्याला दिसते.

भारतातील इतर राज्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील चित्रकला प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती तसेच गुणवत्तेमध्ये देखील श्रेष्ठ होती हे आपल्याला दिसून येते. पुढे मराठेशाही काळामध्ये आपल्याला या चित्रकलेचा वापर झालेला पहावयास मिळतो. मराठ्यांच्या कालखंडात आपल्याला गुलाबी रंगाच्या पृष्ठभूमीवर तत्कालीन विविध विषय  चित्रित केलेले पहावयास मिळतात. या सर्व संदर्भांनुसार मध्ययुगामध्ये देखील वास्तूच्या सजावटीसाठी घरे रंगवीत असत आणि त्याच्यावर चित्रे काढीत असत हे आपल्याला काही मध्ययुगीन इमारतींच्यावर शिल्लक राहिलेल्या खुणांच्या रुपामध्ये आजही पहावयास मिळते.

Image:- वेरूळ लेण्यांमध्ये असलेले चित्र. Image Source:- https://tr.pinterest.com 

अश्या काही मध्ययुगीन इमारती या आपल्याला आजही दौलताबाद परीसरामध्ये पहावयास मिळतात तसेच विजापूरजवळ कुमटगी येथे काही वर्षांपूर्वी आदिलशाही काळातील जलमंदिराचा काही भाग शिल्लक होता त्या जलमंदिराचा अभ्यास करणाऱ्या आणि वर्णन करणाऱ्या लोकांनी या जलमंदिरातील चित्रांची नोंद करून ठेवलेली आहे. या महत्वाच्या इमारतीच्या सजावटीसाठी रंग आणि चित्रे यांचा उपयोग करण्यात येत असे हे स्पष्ट होते. तसे पहायला गेले तर भित्तीचित्रे ही भारतीय चित्रकलेचे अत्यंत महत्वाचे अंग होते हे आपल्याला दिसून येते. प्राचीन कालखंडापासून ते इ.स. १८ व्या शतकापर्यंत हि प्रथा चालत आलेली होती हे आपल्याला पहावयास मिळते.

परंतु आपल्याला मध्ययुगातील कामाची काही उदाहरणे पहावयाची असतील तर मध्ययुगातील चित्रकलेचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला कापडी पट आणि कागद यांच्याकडे मुख्य स्रोत म्हणून पहावे लागते. मध्ययुगातील कापडी पट आज मात्र फारसे अस्तित्वात नाहीत परंतु कागदावर काढलेली चित्रे मात्र आजही उपलब्ध आहेत. परंतु कागदावर काढलेली चित्रे देखील फारच थोडी असल्याने आजही आपल्याला फाटलेल्या किंवा तुटलेल्या स्वरुपात ही चित्रे मिळतात. तसेच आजही खानदेश आणि एलीचपूर या महत्वाच्या ठिकाणी झालेले चित्रकाम मोठ्या स्वरुपात मिळालेले नाही. परंतु अहमदनगर येथे जे काही चित्रकाम झाले आहे ते आजही शिल्लक आहे हे काही संदर्भांनुसार आपल्याला पहावयास मिळते.

Image:- इब्राहिम आदिलशाह दुसरा. Image Source:- https://in.pinterest.com 

अहमदनगर येथील निजामशाहीच्या काळातील उपलब्ध आणि प्रसिद्ध संदर्भ हा चित्र असलेला ग्रंथ म्हणजे ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ असून मध्ययुगातील सगळ्यात जुना चित्र असलेला ग्रंथ म्हणून उल्लेख करता येईल. ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथाची रचना हि हुसेन निजामशाह याच्या कारकीर्दीच्या शेवटी सुरु झालेली असली तरी हा ग्रंथ पूर्णत्वाला त्याच्या मृत्युनंतर गेला. जेव्हा ‘तारीफ-ई -हुसेनशाह बादशाह दख्खन’ हा ग्रंथ पूर्ण करण्याचे आणि त्यातील चित्रे काढण्याचे काम हुसेन निजामशाह याची पत्नी हुमायुँशा हिने केले असावे. हुसेन निजामशाह याच्या मृत्युनंतर अहमदनगरच्या निजामशाहीची सूत्रे हि हुमायुँशा हिच्या हाती होती तेव्हा याकाळामध्ये ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ हा ग्रंथ पूर्ण झाला असावा. म्हणजेच या ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथाचा कालखंड हा इ.स. १५६५ ते १५७० असा असावा. ‘

‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथातील चित्रे हि ग्रंथामधील विषयाला अनुसरून आहेत. फारसी काव्यग्रंथाच्या प्रथेप्रमाणे ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ याचे दोन मुख्य भाग आहेत. एका भागामध्ये हुसेन निजामशाह याच्या पराक्रमाचे वर्णन असून वीरगाथा म्हणजेच ‘बझमनामा’ आणि दुसऱ्या भागामध्ये हुसेन निजामशाह याच्या प्रणयराधानेचे ‘रझमनामा’ याचे वर्णन आपल्याला आढळून येते. वीर आणि शृंगार हे दोन रस मुख्य असल्याने चित्रकाराला योग्य विषय मिळालेले आपल्याला बघायला मिळतात. ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथामध्ये तेरा चित्रे आपल्याला पहावयास मिळतात. ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथाची मूळ प्रत(Original Copy) सध्या पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अत्यंत व्यवस्थित रितीने जपून ठेवलेली आहे.

फोटो:- ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’

Image:- ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’. Image Source:- Indian Books and Periodicals 

‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यामधील तेरा चित्रे हि ‘दख्खनी कलम’ म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेली असल्याने या चित्रशैलीचे उगमस्थान हे महाराष्ट्रातील असल्याने या चित्रांना खूप महत्व प्राप्त झालेले आहे. केवळ या तेरा चित्रांच्या मुळे पुढे याचा मोठा प्रभाव दक्षिणेमध्ये तयार झाला आणि यातून विजापूर, गोवळकोंडा येथे अत्यंत उच्च प्रतीची आणि अत्यंत सुरेख आणि देखणी चित्रशैली तयार झालेली आपल्याला पहावयास मिळते. तसे पहायला गेले तर ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यातील चित्रांची निर्मिती हि काही लगेच झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. हि चित्रे निर्माण होण्यामागे याच्या इतिहासाचा मागोवा घेणे नक्कीच आपल्याला गरजेचे आहे.

‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यामधील चित्रांना जर आपण नीट पाहिले तर आपल्याला असे लक्षात येते कि इराणी, माळवा, विजयनगर येथील चित्रकलेशी या चित्रकारांचा संबंध होताया चित्रांच्या रंगरेषेवरून बारकाव्यांची माहिती या चित्रकारांना चांगली होती हे समजते. वरील चित्रशैलींमधून चित्रकाराने बरेचसे बारकावे आणि तपशील उचलून यातून एका नवीन चित्रशैलीची निर्मिती केली. तसेच ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यामधील चित्रांना स्वत:चे निराळेपण आणि वैशिष्ट्य प्राप्त झाले. हे या नवीन तयार झालेल्या चित्रशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल.

 

Image:- फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी आपल्या हातामध्ये धरून उभी असलेली राजस्त्री. Image Source:- http://www.indianart.ru/

‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यामधील तेरा चित्रे कोणती आहेत हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. तेरापैकी चार चित्रे हि आपल्याला हुसेन निजामशाह हुमायुँशा यांची एकत्र चित्रे आपल्याला पहावयास मिळतात. एका चित्रामध्ये आपल्याला हुसेन निजामशाह एकटा पहावयास मिळतो. सहा चित्रे हि तालीकोट येथील रणसंग्रामाची असून एक चित्र हे एका युवतीचे असून तिने फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी आपल्या हातामध्ये धरून ती उभी असलेली आपल्याला पहावयास मिळते आणि तिच्या शेजारी तिच्या मैत्रिणी किंवा सख्या आपल्याला पहावयास मिळतात. तसे पहायला गेले तर हे युवतीचे आणि तिच्या सख्यांचे चित्र ‘दोहदपूरण’ नावाच्या विधीचे चित्र आहे.

तसेच पहिले पान हे सजावटीच्या चित्राचे असून अशी सगळी मिळून तेरा चित्रे होतात. हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा यांची चित्रे हि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून अत्यंत अप्रतिम अशी हि चित्रे आहेत. यातील दोन चित्रांच्यामध्ये हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा एकाच मंचकावर(बेड) एकाठिकाणी बसलेले आपल्याला पहावयास मिळतात. तसेच दोन चित्रांच्यामध्ये आपल्याला हुमायुँशा हि हुसेन निजामशाह याच्या मांडीवर बसलेली असून दोघांचे हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवलेले दाखवलेले आपल्याला पहायला मिळतात. या चारही चित्रांच्यामध्ये हुसेन निजामशाह याचे चित्र एकसारखे आहे. तसेच पाचवे चित्र जे आपल्याला पुस्तकात पहावयास मिळते ते देखील हुसेन निजामशाह याचे एकट्याचे चित्र असून हे चित्र देखील त्याच माणसाचे आहे हे आपल्याला सहजरीतीने समजून येते हे मात्र विशेष. या चित्रांच्यावरून आपल्याला हे समजण्यास नक्की मदत होते कि हे खरोखरच व्यक्तीचित्रण आहे. वरील चित्रांच्यावरून हुमायुँशा हिची चित्रे देखील तशीच व्यक्तीचित्रणे असावीत हे आपल्याला समजण्यास मदत होते.

परंतु पुढील काळामध्ये कोणाला तरी  हा ग्रंथ हाती पडला असावा त्याने या चित्रांच्यामध्ये काही बदल केलेले आपल्याला पहावयास मिळतात. त्यामध्ये पुन्हा रंगकाम करून हुमायुँशा हिचे चित्र झाकून टाकलेले आपल्याला पहावयास मिळते. या चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इराणी किंवा कोणत्याही मुस्लीम देशातील इस्लामी चित्रकाराने एखाद्या स्त्रीचे व्यक्तीचित्र रेखाटलेले आपल्याला पहावयास मिळत नाही. तसेच कोठेही असे चित्र प्रसिद्ध झालेले दिसत नाही. काव्य आणि कथेमध्ये स्त्रीपात्रे यांची चित्रे आपल्याला आढळून येतात तसेच लैला-मजनू आणि शिरीन-फरहाद यांच्या चित्रात त्या काव्यांच्या नायिकांची चित्रे आहेत परंतु स्त्रियांची व्यक्तीचित्रे नाहीत.

Image:- हुसेन निजामशाह याचे व्यक्तिमत्व चित्रातून समजण्यास मदत होते. Image Credits:- https://commons.wikimedia.org/

परंतु ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथामध्ये आपल्याला हुमायुँशा या राणीचे व्यक्तिचित्र पहावयास मिळते. हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा हे अश्या पद्धतीने बसलेले आहेत कि त्यांना पाहिल्यावर विष्णू-लक्ष्मी किंवा शिव – पार्वती यांच्या मूर्ती ज्यापद्धतीने घडवतात त्याची आठवण नक्कीच येते. हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा यांच्या चित्राचा आशय हा केवळ  भारतीय नव्हे तर हिंदू परंपरेतील असल्याचे जाणवते. अहमदनगरच्या निजामशाहीच्या इतिहासाची पूर्वपीठिका थोडीशी आपण पाहिली तर काही गोष्टी समजण्यास मदत होते.

मुळात अहमदनगर येथील निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद हा जन्माने हिंदू होता पुढे तो मुसलमान झाला. मलिक अहमद हा अहमदनगर आणि वऱ्हाड यांच्या हद्दीवर असणाऱ्या पाथरी गावी कुलकर्णीपणाचे काम करणाऱ्या कुटुंबातील होता. पाथरीचे कुलकर्णी आणि नगराचे बहरी(बहिरोपंत) राजघराण्याचे नाते पुढे कितीतरी पिढ्यांच्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या स्मरणात होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाथरी गाव हे आपल्या ताब्यात राहावे म्हणून अहमदनगरच्या निजामशाही राजांनी सतत प्रयत्न केलेले आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे अहमदनगर येथील निजामशाही घराण्याची हिंदू पूर्वपीठिका अत्यंत महत्वाची ठरते. म्हणूनच राजा आणि राणी हे साक्षात विष्णू-लक्ष्मी असे समजण्याच्या हिंदू परंपरेमधून हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा यांची हि चित्रे निर्माण झाली आहेत असे मानायला काही हरकत नाही. यामधून कलेचा संगम मात्र दिसून येतो आणि नवीन कला तयार झालेली आपल्याला पहायला मिळते.

Image:- हुसेन निजामशाह समोर नाचणारी नर्तकी. Image Source:- https://openresearch-repository.anu.edu.au 

‘दोहदपूरण’ याचा मागे उल्लेख आलेलाच आहे. या ‘दोहदपूरण’ या नावाने ओळखले जाणारे चित्र आपले जास्त लक्ष वेधून घेते. यामध्ये फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी आपल्या हातामध्ये धरून उभी असलेली राजस्त्री आणि तिच्या चार ते पाच मैत्रिणी(सख्या) असे हे अत्यंत सुंदर चित्र असून एखाद्या सुंदर स्त्रीने अशोकाच्या झाडाला आपल्या पायाने स्पर्श केला असता त्या वृक्षाला फुलांचा बहर येतो असे प्राचीन कवितांच्यामध्ये उल्लेख आहेत. या गोष्टींचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाड.मयामध्ये खूप उल्लेख मिळतात. तसेच ‘मालविकाग्निमित्र’ नाटकामध्ये या वरील संकेताचा वापर केल्याचे आपल्याला दिसून येते. प्राचीन शिल्पांच्यामध्ये आपल्याला वृक्षाला पायाने विळखा घालणारी, आलिंगन देणारी, तसेच झाडाच्या फांदीला लोंबकळणारी तरुण स्त्री आपल्याला सर्वत्र आढळते. या शिल्पाचा तिच्या प्रजाननाशी संबंध आहे.

सुंदर स्त्रीच्या पदस्पर्शाने बहर येतो तसा या वृक्षस्पर्शाने स्त्रीची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशोकाच्या झाडाची इच्छा पुरविली कि त्या स्त्रीची पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण होते म्हणून स्त्रिया हा विधी करत असत. तोच विधी हुसेन निजामशाह याची लावण्यवती बेगम हुमायुँशा येथे करत असावी. ‘दोहदपुरण’ चित्रातील स्त्री येथे दुसरी कोणतीही स्त्री नसून हुमायुँशा हीच आहे. हे हुमायुँशा हिचेच व्यक्तिचित्रण आहे हे आपल्याला समजते.

Image:- हुसेन निजामशाह लढाईला जाताना. Image Source:- https://pixels.com

आपल्याला हुसेन निजामशाह याचे एक चित्र पहायला मिळते. यामध्ये हुसेन निजामशाह हा आपल्याला एकटाच मंचकावर बसलेला पहायला मिळतो. या चित्रातील देखावा हा दरबारामध्ये चाललेल्या नृत्यगायनाचा असून हुसेन निजामशाह याच्या डाव्या बाजूला आपल्याला जमिनीवर दोघे बसलेले पहावयास मिळतात. त्यापैकी एकजण हातवारे करताना आपल्याला पहावयास मिळतो. बहुदा तो हातवारे करून काहीतरी सांगत आहे किंवा गाणे गात आहे. तसेच त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला वीणा हातामध्ये धरून आणि टाळ हातामध्ये घेतलेले दोन साथीदार आपल्याला बघायला  मिळतात. तसेच चित्राच्या खालच्या पट्ट्यामध्ये आपल्याला दोन नर्तिका आणि त्यांचे साजिंदे आपल्याला पहायला मिळतात.

या चित्रामध्ये हुसेन निजामशाह याची चेहरेपट्टी हि ‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ या ग्रंथामध्ये त्याची आधी जी चार चित्रे आपल्याला पहावयास मिळतात त्याच्यासारखीच आहे. तसेच हुसेन निजामशाह याचे व्यक्तिमत्व ओळखू येईल असेच आहे. यामध्ये सगळ्याच चित्रामध्ये दोन बाजूला रुमालाने वारा घालणाऱ्या दासी उभ्या असून त्यांचा पेहेराव देखील पाहण्यासारखा आहे यावरून तत्कालीन वेशभूषा समजण्यास आपल्याला मदत होते. या दासींची चित्रे हि काहीशी उभट आणि सडपातळ दाखवलेली असून दासींचे चेहरे एकसारखे पहावयास मिळतात. तसेच या वारे घालणाऱ्या दासींच्या अंगाखांद्यावर आपल्याला तत्कालीन दागिने देखील पहावयास मिळतात. आपल्याला या चित्रांच्यामध्ये आकृतीचे संयोजन आणि पृष्ठभूमी सारखीच पहावयास मिळते. हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा हे मध्यभागी आणि इतरांच्यापेक्षा मोठ्या आकाराचे चित्रित केलेले पहायला मिळतात.

Image:- दुसऱ्या निजामशाहचे चित्र. Image Source:- http://www.indianart.ru 

तसेच हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा यांच्याभोवती कमानी, खिडक्या अश्या वास्तूरूप चौकटी देखील दर्शविलेल्या आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये आपल्याला फुलझाडे देखील पहावयास मिळतात तसेच वरच्या बाजूस कापडी छत देखील पहायला मिळते आणि त्यावर असलेले नक्षीकाम देखील पहावयास मिळते. तसेच  एका चित्रामध्ये आपल्याला घुमटाकार छप्पर देखील पहायला मिळते. पहायला गेले तर सगळेच भाग हे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे कापून एकमेकाशेजारी चिकटवावेत तसे आपल्याला दिसून येतात. या चित्रांच्यामध्ये पृष्ठभूमीच्या निरनिराळ्या वेगवेगळ्या पातळ्या एकमेकांच्यामध्ये मिसळून गेल्याचा भास कोठेही होत नाही. त्यामुळे या चित्रांच्यामधून आपल्याला एखाद्या रंगपटावरचा भास प्रसंग आपण पहात आहोत असा भास होतो.

‘तारीफ-ई-हुसेनशाह बादशाह दख्खन’ यामध्ये असलेल्या तालीकोट लढाईची जी सहा चित्रे आपल्याला पहावयास मिळतात यामध्ये आपल्याला अगदी सारखेपणा दिसून येतो. यामध्ये सैनिक, हत्ती, घोडेस्वार, हे सगळे तीन आडव्या पट्ट्यामध्ये चित्रित केलेले असून एकावर एक मांडलेले आपल्याला पहावयास मिळतात. या चित्रांच्या हालचालीमध्ये गती आणि जीवंतपणा आपल्याला दिसून येतो. हे चित्रसंयोजन फार आखीव असून या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रामराजाचा शिरच्छेद करणारा बादशहा आपल्याला पहायला मिळतो.

Image:- तालीकोट लढाई भाग १. Image Source:- https://commons.wikimedia.org

चित्राची रंगयोजना हि गडद आणि काहीशी भडक असून सगळ्या चित्रांना गडद निळ्या किवा दाट हिरव्या रंगाची पृष्ठभूमी आपल्याला पहावयास मिळते. तसेच यामध्ये दाखवलेल्या स्त्रियांची वस्त्रे अश्याच हिरव्या निळ्या आणि लाल रंगांची असून त्याच्यावर सोनेरी रंगाने नक्षी आणि दागिनेरंगवलेले दिसतात. या चित्रांच्यामधील पुरुष आकृती या पांढऱ्या स्वच्छ कपड्यात असून चित्रामध्ये छतासाठी आणि कनातीसाठी फिकट निळसर रंगाचा उपयोग केलेला असून असाच एका चित्रामध्ये हुसेन निजामशाह याचा अंगरखा किंचित गुलाबी रंगासदृश आपल्याला पहावयास मिळतो.

या सर्व चित्रांना पूर्वइतिहास आहे आणि हि चित्रे विविध विषयांमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. या चित्रांचे विवेचन करणे नक्कीच महत्वाचे आहे कारण या चित्रांच्यामधील चित्र संयोजन त्यामध्ये दाखवलेल्या वास्तू, कमानी, फुलझाडे, हि अश्या पद्धतीमधील चित्रे आपल्याला इराणी चित्रशैलीमध्ये दिसतात तशीच इथे दर्शवलेली आहेत. तसेच चित्रामध्ये दाखवलेल्या पुरुषमाणसांच्या आकृती आणि चेहेरेपट्टी हि मांडू येथील चित्रांच्यामध्ये जशी आपल्याला पहायला मिळतात तशीच आहेत. चित्रांच्यामध्ये आपल्याला ‘दोहदपूरण’ मधील हुमायुँशा बेगम आणि दासींची दिसणारी आकृती त्यांच्या अंगावरील वस्त्रे हे सगळे विजयनगर(हंपी) येथील चित्रांशी नाते सांगतात.

Image:- तालीकोट लढाई भाग १. Image Source:- https://commons.wikimedia.org

विशेष करून यामध्ये ज्या नर्तकी दिसतात त्या दक्षिण भारतीय दिसतात. यामधील चित्रांची रंगसंगती हि देखील विजयनगर परंपरेमधील आहे. हे सर्व घटक एकत्र करून एक वेगळ्या पद्धतीचे चित्र तयार करणारे चित्रकार कुठल्या प्रदेशातून आले आणि हुसेन निजामशाह याच्या मृत्युनंतर हे चित्रकार कोठे गेले किंवा पुढे याच परंपरेमधली चित्रे का तयार झाली नाहीत याबद्दलचे उत्तर इतिहासाकडे देखील नाही. हुसेन निजामशाह याचे एक रेखाचित्र उपलब्ध झालेले असून त्यामध्ये हुसेन निजामशाह हा उभा असून समोर छोटेखानी हत्ती आणि त्याच्यावर बसलेला माहूत आपल्याला पहायला मिळतो. त्या चित्रामध्ये एका बाजूला फुलझाड देखील आपल्याला पहायला मिळते.

हुसेन निजामशाह याच्या चित्रामध्ये आपल्याला त्याच्या चेहेऱ्यामध्ये आणि तारीफ मधील त्याच्या चेहेऱ्यात मोठे साम्य आढळून येते त्यामध्ये हे समजायला आपल्याला नक्की मदत होते कि हे चित्र नक्कीच याच चित्रकाराने काढलेले आहे. तसेच मुर्तजा निजामशाहची दोन चित्रे आणि तिसऱ्या बुऱ्हाण निजामशाहचे एक चित्र अशी चित्रे संग्रहालयामध्ये आजही सुरक्षित ठेवलेली आहेत. एका चित्रामध्ये आपल्याला असे दिसून येते कि एका मोठ्या शोभिवंत खुर्चीमध्ये मुर्तजा निजामशाह हा सुलतान बसलेला असून त्याच्या डाव्या हाताला दोन आणि समोर एक सेवक उभे असलेले पहायला मिळतात.

तर दुसऱ्या चित्रामध्ये हाच मुर्तजा निजामशाह एका छप्पर असलेल्या पलंगावर लोडाला टेकून विसावा घेत असलेला आपल्याला पहावयास मिळतो. यामध्ये मुर्तजा निजामशाह याच्या दोन्ही चित्रामध्ये चेहेऱ्यामध्ये साम्य आहे. या चित्रांच्यामधील सर्वच माणसांचे चेहरे साधारणपणे तीन चतुर्थांश(3/4) पहायला मिळतात. यामध्ये मुर्तजा निजामशाह याची दोन्ही चित्रांची पृष्ठभूमी सपाट रंगाने आच्छादलेली असून त्यामध्ये कोणताही तपशील दिसत नाही अथवा पहायला मिळत नाही.

Image:- निमतनामा आणि तारीफ ई हुसेनशाही यामधील चित्रांच्यामध्ये साम्य आढळते. Image Source:- https://www.pinterest.com/madhavijaisalme/nimatnama 

तिसऱ्या बुऱ्हाण निजामशाहचे चित्र हे अत्यंत वेगळे दिसते. या चित्रामध्ये आपल्याला तिसरा बुऱ्हाण निजामशाह हा हातामध्ये भलीमोठी तलवार घेतलेला असून मध्यम वयातील राजपुरुष रेखाटला आहे. तसेच या चित्राला देखील पृष्ठभूमी पहायला मिळत नाही. तसेच मलिक अंबर आणि त्याचा मुलगा फत्तेखान यांची व्यक्तिचित्र हि सध्या बोस्टन येथील संग्रहलयामध्ये असून चित्रामध्ये चेहरेपट्टीमध्ये  व्यक्तिचित्रणाचा हेतू अगदी स्पष्टपणे समजतो. तसेच अहमदनगर येथील संग्रहालयामध्ये मलिक अंबर याचे चित्र आपल्याला पहायला मिळते.

याशिवाय निरनिराळ्या संग्रहालयात असणारी जवळपास दहा-बारा रागमाला चित्रे हि अहमदनगर आणि परिसरात तयार झालेली असावीत. यामधील काही चित्रांच्या पृष्ठभागातील इमारती, कनाती, घुमट, यांचा वापर पुरुष आकृतींचे चेहरे आणि शिरस्त्राण तसेच काहीशा उंच सडपातळ अशा स्त्री आकृती आणि त्यांचे पेहेराव याचे तारीफमधील तत्सम तपशील याच्याशी साम्य आपल्याला दिसून येते. परंतु इतर गोष्टी विशेष करून चित्राचे संयोजन, वृक्षवल्लींचे रेखाटन आणि रंगयोजना यांचे मुघल चित्रकामाशी जास्त जवळचे नाते आहे. हि चित्रे दाराबाराशी संबंध आलेल्या किंवा त्याच परंपरेत वाढलेल्या एखाद्या कलाकाराने काढलेली असावीत असे वाटते. तसेच या चित्रकाराला अहमदनगर येथे तयार झालेल्या चित्रशैली मधल्या गोष्टी नक्कीच माहिती असाव्यात.

Image:- हुसेन निजामशाह आणि हुमायुँशा यांची चित्रे. Image Source:- https://slidetodoc.com

अहमदनगर मधील निजामशाही चित्रकला हि बहुगुणी असली तरी देखील अल्पायुषी ठरलेली आपल्याला दिसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे १६३६ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा झालेला ऱ्हास. ज्याप्रमाणे साहित्यिक अहमदनगरच्या निजामशाहिचा दरबार सोडून विजापूरच्या आदिलशाह आणि गोवळकोंडा येथील कुतुबशाहकडे गेले तसेच त्या दरबारी साहित्यिकांच्या सोबत चित्रकार देखील निजामशाही सोडून गेलेले असल्यामुळे दख्खनी चित्रकलेचा पहिला भाग इथेच संपला आणि अहमदनगरची चित्रशैली विस्मृतीमध्ये गेली.

References:-

1) Tarif I Husain Shah Badshah Dakhan:-  Kulkarni G. T. and Mate M. S. (Ed.), Pune, 1987.

2) Deccan Painting:- Zebrowski, Mark, Bombay, 1983.

3) Painting, History of Medieval Deccan, Hyderabad:-  1974, Vol, II, P.-201-225

4) Marg, vol. 16, No. 2. Jagdish Mittal

5) मध्ययुगीन महाराष्ट्र सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन:- म.श्री. माटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, २००२.

Array

Your email address will not be published. Required fields are marked *