दक्षिण आणि पश्चिम भारतातील पथ पद्धती1 min read
Reading Time: 8 minutesउत्तर भारत आणि दक्षिण भारत यांची भौगोलिक विभागणी हि सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्यामुळे झालेली आपल्याला पहायला मिळते. सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत या डोंगररांगांच्यामुळे उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे केलेले आपल्याला दिसते. विंध्य पर्वतामुळेच उत्तर भारताला पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या बंदराशी जोडतो तसेच दक्षिणेकडील प्रसिद्ध शहरांसाठी देखील विंध्य पर्वत महत्वाची भूमिका बजावतो. या भूमिकेसाठी विंध्य पर्वताचे महत्व प्राचीन काळापासून खूप आहे हे आपल्याला दिसून येते.
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या महत्वाच्या राजमार्गांच्यामध्ये चार ते पाच मार्ग अत्यंत महत्वाचे आहेत. तसे पाहायला गेले तर मारवाड येथील वाळवंट आणि कच्छ रण या दोघांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे गुजरात आणि सिंध यांच्या दरम्यान जो रस्ता आहे तो दुर्गम झालेला आहे त्यामुळे प्राचीन काळामध्ये पंजाब आणि गुजरात यांच्यामधील रस्ता माळव्यातून जात असे. याला अपवाद म्हणजे गझनीच्या महमूद सारखे लोक काठेवाड येथील रस्ता कमी करण्यासाठी सिंध आणि मारवाड येथून देखील गेलेले आपल्याला इतिहासामध्ये पहायला मिळतात तसेच गुजरात आणि सिंध यांच्यामधील रस्ता हा समुद्रकिनाऱ्यावरूनच जात असे. तसेच अरवली पर्वताप्रमाणे दिल्ली येथून अजमेर तसेच अजमेर येथून अहमदाबाद असा जाणारा मार्ग मध्य राजस्थान मार्गे अरवली पर्वतच्या पश्चिम पायथ्यावरून अजमेरच्या पुढे जात होता असे काही उल्लेखाच्या वरून आपल्याला समजते तसेच हा जो मुख्य मार्ग आहे तो राजस्थान आणि दक्षिण देश यांच्यामधील नैसर्गिक मार्ग होता.
Image: Cultural Heritage of Mumbai, Author M. K. Dhavalikar
तसे पहायला गेले तर मथुरा – आग्रा मार्ग हा चंबळ नदीच्या खोऱ्यामधून उज्जयिनी येथे आलेला दिसतो आणि पुढे हाच मार्ग आपल्याला नर्मदेच्या खोऱ्यामध्ये शिरलेला आपल्याला दिसतो. दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी प्राचीन राजमार्गाचे हेच वळण होते. खांडवा आणि उज्जयिनी यांच्यामध्ये सध्या ज्या ठिकाणी लोहमार्ग (रेल्वे लाईन) जिथे नर्मदा नदी ओलांडतो त्याठिकाणीच प्राचीन महिष्मती नगरी होती. सध्या या महिष्मती नगरीचे नाव महेश्वर असे आहे. ज्याठिकाणी विंध्य पर्वताचा गुजरी घाट आणि सातपुड्याचा सिंधवा घाट दक्षिण भारतामध्ये जाण्यास नैसर्गिक वाट देतात त्याठिकाणी नर्मदा नदीवर महिष्मती हे शहर वसले होते. तसेच सातपुडा पर्वत ओलांडल्यावर तापी नदीवर आपल्याला बुऱ्हाणपूर हे मध्ययुगातले महत्वाचे शहर लागते. बुऱ्हाणपूर येथून एक रस्ता तापी नदीच्या खोऱ्यातून खानदेश मधून पुढे पश्चिम घाट ओलांडून सुरत येथे जातो तसेच दुसरा एक महत्वाचा मार्ग पुण्याच्या घाटातून वऱ्हाड आणि गोदावरीच्या खोऱ्याकडे गेलेला आपल्याला पहायला मिळतो.
उज्जयिनी हे शहर प्राचीन अवंती राज्याची राजधानी होती. तसेच पूर्व माळवा प्रदेशाला ‘आकर’ या नावाने संबोधत असत या ‘आकर’ राज्याची राजधानी विदिशा शहर होते. हे विदिशा शहर सध्या ‘भिलसा’ या नावाने ओळखले जाते. अशीच प्राचीन महामार्गाची एक प्रमुख शाखा भरूकच्छ म्हणजेच सध्याचे भडोच किंवा भरूच आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई जवळील सुप्पारक म्हणजेच सोपारा किंवा आजचे नालासोपारा या प्राचीन आंतरराष्ट्रीय बंदरांच्यावरून उज्जयिनी आणि पुढे मथुरेला पोहोचत असते. तसेच अजून एक दुसरी शाखा विदिशा येथून बेटवा नदीच्या खोऱ्यामधून कौशांबी येथे जात असे. या प्राचीन महामार्गाचे वळण हे भिलसा येथून झाशी तेथून काल्पी येथे जाणाऱ्या रेल्वे मार्गाप्रमाणे होते या रस्त्यासंदर्भात आपल्याला प्राचीन उल्लेख बघणे महत्वाचा ठरतो त्यासाठी आपल्याला गोदावरी येथील किनाऱ्यावरील तपस्वी ब्राम्हणाचे शिष्य याचमार्गाने पुढे कौशांबी येथे गेलेले आपल्याला पुढील कथेवरून समजते.
Image:- प्राचीन आंतरराष्ट्रीय बंदर नालासोपारा येथे सापडलेला सम्राट अशोकाचे महत्वाचे शिलाशासन.
Source: https://en.wikipedia.org
हा महत्वाचा संदर्भ असलेला उल्लेख आपल्याला बौध्द वाड;मयामध्ये आढळून येतो तो पुढीलप्रमाणे:- एका ब्राम्हणाने दिलेल्या शापाचा अर्थ समजून घेण्यासाठी बावरीने आपल्या शिष्यांना गौतम बुद्धाकडे पाठवले होते. या शिष्यांनी आपला प्रवास अस्सक येथून सुरु केला तेथून ते पतिठ्ठान म्हणजेच सातवाहन काळातील प्रतिष्ठान आणि सध्याचे पैठण यामार्गाने महिस्सती म्हणजेच महिष्मती नगरी सध्याचे महेश्वर तेथून उज्जैणी म्हणजेच उज्जयिनी तेथून पुढे गोनद्ध, वेदसा म्हणजेच विदिशा सध्याचे भिलसा इथून पुढे वनसव्हय यामार्गाने कौशांबी येथे जाऊन पोहोचले.
तसेच मथुरा-आग्रा याच्या दक्षिणेस कानपूर आणि प्रयाग पर्यंत पाहिल्यास असे आपल्याला पहावयास मिळते कि बेटवा, टोंस आणि केन नदी यांचे प्रवाह एका वेगळ्या मार्गाचे निर्देशन करतात. भौगोलिक दृष्ट्या पहावयास गेले तर आपल्याला असे दिसून येते कि टोंस आणि केन या नद्यांच्या दरम्यान विंध्य पर्वताची पन्ना रांग हि निमुळती होत गेलेली आपल्याला पहायला मिळते. हि निमुळती रांग ओलांडली कि सोन आणि नर्मदा यांच्या मधल्या भागामध्ये तसेच जबलपूरपर्यंत सरळ जाता येते. जबलपूरपासून जवळच तेवर हे प्राचीन चेदी गणराज्याची राजधानी होती. तसेच प्रयागपासून जबलपूर येथील रस्ता बुंदेलखंड येथील महामार्गाचा महत्वाचा रस्ता आहे. तसेच जबलपूर येथून उत्तरेला काही अंतरावर कटनी या गावावरून एक रस्ता छत्तीसगड येथे जातो. जबलपूर येथून अजून एक रस्ता वैनगंगा नदीच्या अनुरोधाने गोदावरीच्या खोऱ्यामध्ये जातो. तसेच जबलपूर येथील एक महत्वाचा रस्ता हा नर्मदा नदीच्या खोऱ्यामधून विदिशा म्हणजे भिलसा येथून इटारसीला जाऊन मिळतो तसेच उज्जयिनी-महिष्मती हा रस्ता खांडवा येथे मिळतो.

Image:- प्राचीन दक्षिण पथाच्या सुरु होणाऱ्या रस्त्यावर विदिशा येथे असलेला हेलिओडोरस याचा स्तंभ.
Image Source:-https://puratattva.in
तसे बघायला गेले तर विंध्य पर्वताच्या टापूतील रस्ते दक्षिणेमध्ये जाऊन संपतात. तसेच दिल्ली आणि गुजरातचा मार्ग माळवा आणि राजस्थान येथून बडोदा येथे आल्यावर समुद्राच्या किनाऱ्याने दक्षिणेमध्ये शिरतो. तसेच समुद्र आणि पठार यांच्यामध्ये सह्याद्रीची भिंत असल्याने यामार्गाचे महत्व कमी झाल्याचे दिसून येते. मुंबई नंतर ह्या सगळ्या मार्गाला केवळ उपमार्गाचे महत्व उरलेले दिसते. माळवा येथून येणारा मार्ग नाशिकजवळ नाणेघाटातून सह्याद्री ओलांडून पुढे सोपारा म्हणजेच नालासोपारा आणि कलीआन म्हणजेच आजचे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असलेल्या कल्याणकडे आणि चौलकडे जातो. प्रयाग येथून निघालेला रस्ता बुंदेलखंडमार्गे नागपूर येथे जाऊन गोदावरीच्या खोऱ्यामधून आंध्र प्रदेश येथे जाऊन पोहोचतो.
दक्षिण भारताची भौगोलिक रचना आपण समजून घेतली तर येथील मार्ग हे नद्यांच्या सोबत जाताना आपल्याला पहायला मिळते. एक रस्ता हा मनमाड मार्गे मच्छलीपटणच्या लोहमार्गासोबत गेलेला दिसतो. तसेच दुसरा मार्ग पुण्यावरून कांजीवरमला तसेच गोव्यावरून तंजावर मार्गे नागापट्टण येथे एक रस्ता जातो तसेच कालिकत येथून रामेश्वर येथे रस्ता जातो तसेच पालघाट ओलांडून मलबार आणि चोल मंडळ यांच्यामध्ये महामार्ग तयार झालेला दिसतो. यातील पहिले तीन मार्ग फार महत्वाचे होते. महाराष्ट्रातील मनमाड येथून आग्नेय दिशेकडे निघालेला मार्ग अजिंठा आणि बालाघाट पर्वतांच्या रांगा ओलांडून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये शिरतो. दौलताबाद, औरंगाबाद आणि जालना या ठिकाणांवरून नांदेड येथे गोदावरी नदीवरून थोडा दूर जाऊन नदी ओलांडतो. तसेच हा प्राचीन मार्ग सरळ वारंगळ पर्यंत जातो आणि तेथून विजयवाडा येथे पोहोचल्यावर बंगालच्या उपसागराला जाऊन समाप्त होतो.

Image:- युआन श्वांग या चीनी प्रवाश्याने केलेली वर्णने महत्वाची आहेत. Image Source:- https://mobile.twitter.com/
‘सुत्तनिपात’ या ग्रंथावरून आपल्याला महत्वाचा संदर्भ सापडतो तो म्हणजे इ.स.पू ५ व्या शतकात ह्या प्राचीन मार्गावर खूप रहदारी होती. बावरीचे शिष्य गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मध्यभागी असलेल्या अस्सकवरून प्रतिष्ठान (पैठण) तेथून महिष्मती (महेश्वर) आणि उज्जयिनी मार्गे विदिशेकडे गेले असा संदर्भ मागे आपण पाहिलेलाच आहे. पुण्यातून निघालेला मार्ग अहमदनगरकडे जाऊन पुन्हा दक्षिणेकडे गोवळकोंड्याच्या पठारावर जाऊन हाच मार्ग पुढे भीमा नदी बरोबर भीमा-कृष्णेच्या संगमावर येऊन पोहोचतो. तेथून हा मार्ग कृष्णा-तुंगभद्रा दुआबाच्या पूर्व काठाने नालमैलच्या पश्चिमेकडे निघून जातो. तसेच पुढे वडपेन्नार नदीसोबत हा मार्ग घाट ओलांडून समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. तसेच दक्षिणेकडील तिसरा मार्ग महाराष्ट्राच्या सरहद्दीवरून कृष्णा आणि तुंगभद्रा यांच्यामधून विजयनगरजवळ तुंगभद्रा ओलांडून एकतर दुसऱ्या मार्गाला मिळतो किंवा नैऋत्येकडे हरिहरजवळ तुंगभद्रा ओलांडून म्हैसूर राज्यामध्ये शिरतो आणि कावेरी नदीच्या सोबत पुढे जातो.
एकमेकांशी झालेल्या लढाया, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी हे व्यापारी मार्ग उत्तम साधन होते. या प्रत्येक गोष्टीची साक्ष इतिहास आपल्याला देतो. परंतु हे ऐतिहासिक मार्ग आणि त्यांची वर्णने मात्र इतिहास अथवा शिलालेख आपल्याला सांगत नाहीत. पश्चिम आणि दक्षिण भारतामधील मार्गांची माहिती हि आपल्याला अल्बेरुनीच्या वृत्तांतावरून समजण्यास मदत होते. बयाना येथून एक रस्ता मारवाड येथील वाळवंटातून भाटीच्या पुढे लहरी बंदराला म्हणजेच कराची येथे जाऊन मिळतो. तसेच दिल्ली – अजमेर – अहमदाबाद हा रस्ता कनोज बयाना रस्त्याच्या वळणावर होता तसेच मथुरा – माळव्याचा रस्ता मथुरा ते धार रस्त्याचा निर्देशक असल्याचे दिसतो. तसेच उज्जयिनी येथून बयाना मार्गे धारपर्यंत अजून एक रस्ता होता. सध्या पहिला रस्ता मध्य रेल्वेच्या वाटेने मथुरा ते भोपाळ आणि पुढे उज्जयिनी ते इंदोर पासून धारपर्यंत सध्याच्या रस्त्यासारखाच होता असे पहायला मिळते. तसेच अजून एक दुसरा रस्ता पश्चिम रेल्वेमार्गाच्या रस्त्याने भरतपूर ते नागदा आणि तेथून छोट्या रेल्वे रस्त्याने उज्जयिनी येथून इंदोर ते धार ह्या सध्याच्या रस्त्याप्रमाणे होता असे दिसते. तसेच धार ते गोदावरी आणि धार ते ठाणे हे रस्ते पश्चिम रेल्वेच्या मनमाड ते नाशिक आणि ठाण्याच्या फाट्याचे दिशा निर्देशक होते असे आपल्याला दिसून येते.

Image:- टॅव्हर्नीयर या परदेशी प्रवाश्याची मध्ययुगातील वर्णने महत्वाची ठरतात. Image Source:- http://www.columbia.edu
मुघल काळामध्ये उत्तर भारतामधून दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात आपल्याला रहदारी पहावयास मिळते. त्यामध्येच दिल्ली ते अजमेर रस्ता सराय अल्लावर्दी, पतौडी, रेवाडी, कोट, चुक्सर आणि सरसरा याठिकाणांवरून अजमेर येथे जात असे. इलियट आणि डॉसन यांच्या व्हॉल्यूम ५ येथील संदर्भानुसार अजमेर येथून अहमदाबाद येथे जाण्यासाठी तीन रस्ते वापरात होते १) मेडता येथून सिरोही तेथून पट्टन आणि दीसा याठिकाणांवरून २) मेडता येथून पाली येथून भगवानपूर येथून जालोर आणि पट्टणवाल याठिकाणांच्यावरून ३) अजमेर ते जालोर ते हैबतपूर ते अहमदाबाद असे रस्त्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. १७ व्या शतकामध्ये बुऱ्हाणपूर आणि सिरोंज याठिकाणांच्यावरून जाणारा सुरत ते आग्रा मार्ग त्याकाळात खूप प्रसिद्ध होता हे वेगवेगळ्या संदर्भांवरून आपल्याला समजते. या महत्वाच्या मार्गावरून उत्तर भारतामधील माल सुरत बंदरात उतरविण्यात येत असे. टॅवर्नियर आणि पीटर मंडी यांनी या मुख्य रस्त्यावरील बऱ्याच स्टेशनची म्हणजेच पडावांची नावे आपल्या प्रवास वर्णनामध्ये दिलेली आपल्याला दिसतात.
मध्ययुगात बुऱ्हाणपूर हे एक खूप मोठे व्यापारी शहर होते असे आपल्याला खूप वेगवेगळ्या संदर्भांच्या उल्लेखातून दिसून येते तसेच बुऱ्हाणपूर हि दक्षिणेमध्ये उतरण्यासाठी महत्वाची जागा होती. बहामनी काळापासून बुऱ्हाणपुरचे महत्व खूप दिसून येते. बुऱ्हाणपूर येथूनच इराण, तुर्कस्तान, रशिया, पोलंड, अरबस्थान, इजिप्त या देशांना कापड निर्यात होत असे. येथील रस्ता हा बुऱ्हाणपूर येथून माल निघून इछावर आणि सिरोह येथून सिरोंज येथे पोहोचत असे. सिरोंज हे ठिकाण तत्कालीन महत्वाच्या ठिकाणांच्या पैकी होते. सिरोंज येथे त्याकाळात कापडावर रंगछपाईचे काम मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे सिरोंज हे भारतामधील कापडाच्या रंगकामासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण झाले होते आणि भारतातील महत्वाचे कापडाच्या रंगकामाचे केंद्र बनले होते, हे विविध संदर्भांवरून आपल्याला समजते. सिरोंज येथून निघणारा रस्ता हा सिपरी आणि मग ग्वाल्हेर येथे जात असे व पुढे हा रस्ता धोलपूरमार्गे आग्रा येथे पोहोचत असे. तसेच सुरत येथून आग्र्याला जाण्यास एक रस्ता होता तो अहमदाबाद येथून जायचा. या रस्त्याचा उल्लेख टॅवर्नियर आपल्या पुस्तकात देखील करतो. या रस्त्यावर अहमदाबाद आणि आग्रा यांच्यामध्ये मेहसाणा – सिद्धपुर – पालनपुर – मिन्नमाल – जालोर – मेडता – हिंडौन – बयाना – आणि फत्तेपूर सिक्री या गावांच्या मार्गाने आग्रा येथे जात असे.
टॅवर्नियर हा मध्ययुगामध्ये आलेला एक महत्वाचा प्रवासी होता तसेच त्याने केलेले प्रवासवर्णन फार महत्वाचे देखील मानले जाते. याच टॅवर्नियर याने दक्षिण भारतातील रस्त्यांचे उत्तम वर्णन केलेले आपल्याला आढळून येते. टॅवर्नियर याने सुरत येथून गोवळकोंडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर बार्डोली, पिंपळनेर, देवगाव, दौलताबाद(देवगिरी) औरंगाबाद, आष्टी, आणि नांदेड हि शहरे लागत असत असे वर्णन केलेले आहे. तसेच सुरत येथून गोव्याला जाणाऱ्या रस्त्यावर दमण, वसई, चौल, दाभोळ, राजापूर वेंगुर्ले हि महत्वाची शहरे आणि बंदरे लागत असत असा उल्लेख केलेला असून याठिकाणांची सविस्तर माहिती आणि अनुभव आपल्या प्रवासवर्णनामध्ये नोंदवून ठेवेलेले आहे. गोवळकोंडा येथून मच्छलीपट्टण जवळपास १६० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. परंतु हिऱ्यांच्या खाणीवरून गेल्यास २० किलोमीटर अंतर वाढते असे टॅवर्नियर नमूद करतो. सतराव्या शतकात मच्छलीपट्टण हे बंगालच्या उपसागरावर असलेले एक अत्यंत प्रसिद्ध बंदर होते. येथून पेगू, सयाम, आराकान, बंगाल, कोचीन, चीन, मक्का, हरमुज, मादागास्कर, सुमात्रा, आणि मनिला अश्या ठिकाणी जहाजे जात असत.

Image:- मार्को पोलो याची देखील वर्णने महत्वाची आहेत. Image Source:- https://www.britannica.com
१७ व्या शतकात दक्षिणेकडील काही रस्त्यांची अवस्था फार वाईट होती असे देखील उल्लेख आपल्याला आढळून येतात. या अत्यंत वाईट असलेल्या रस्त्यांच्यावरून बैलगाडी जाणे देखील अत्यंत अवघड होते. या रस्त्यांची अवस्था इतकी वाईट होती कि काही ठिकाणी बैलगाड्यांचे सगळे भाग सुटे करून या रस्त्यांच्यावरून न्यावे लागत असे. असाच एक वाईट रस्ता हा गोवळकोंडा ते कन्याकुमारी हा होता असे उल्लेख आपल्याला आढळून येतात. या रस्त्यावरून बैलगाड्या चालू शकत नसत त्यामुळे माल आणि उतारू यांच्या वाहून नेण्यासाठी बैलांचा आणि घोड्यांचा उपयोग केला जात असे तसेच उतारू लोकांच्या वाहतुकीसाठी पालख्या देखील मोठ्या प्रमाणात वापरत असत असे उल्लेख आपल्याला आढळून येतात.
भारताच्या दळणवळण मार्गाचे आणि त्यांचे ऐतिहासिक व भौगोलिक रूप कसे होते हे आपल्याला वरील गोष्टींच्यावरून समजण्यास मदत होते या मार्गांच्या द्वारे भारताची संस्कृति आणि व्यापार यांची तर वाढ मोठ्या प्रमाणात झालीच परंतु याचसोबत भारताचा परदेशी देशांशी संबंध देखील टिकून राहिला तसेच देशातील पथ पद्धतीचा विकास देखील झाला. कोणत्याही देशाचा पथ पद्धतीचा विकास हा त्या देशाचा सांस्कृतिक विकासाचा मापदंड असतो याच प्राचीन आंतरराष्ट्रीय महामार्गावरून जसेजसे उपमार्ग बनत गेले तसेतसे भारतीय संस्कृति आणि सभ्यता हि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेली आपल्याला पहायाला मिळते. अश्या प्रकारे भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागामधील पथपद्धतीचे महत्व आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते.
Reference:-
1) Suttanipat Gatha
2) Travels In India:- Jean Baptiste Tavernier
3) Xuanzang:- A Buddhist Pilgrime On The Silk Road Book
4) Sarthwah:- Dr Motichandra

